नगर, (दि.19 नोव्हेंबर) : संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या रिक्षाचालकाकडे तब्बल 1 किलो 368 ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले आहेत. या दागिन्यांचे बाजारमूल्य तब्बल 56 लाख 89 हजार रुपये आहे. पांढऱ्या रिक्षात संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्यामुळे शहरातील कोतवाली पोलिसांनी त्याची चौकशी केली यानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी कि, कोतवाली पोलिसांचे पथक बाबा बंगाली परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद रिक्षा दिसून आली. या रिक्षा चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी रिक्षा चालकाला पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने फैरोज पठाण असे सांगितले आहे.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी रिक्षाची झडती घेतली असता रिक्षामध्ये 1 किलो 368 ग्रॅम सोने असलेली बॅग मिळून आली. या सोन्या विषयी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने पोलिसांना ठोस पुरावे दिले नाही. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
