शेती उपयोगी दुकाने सुरु ठेवावी : जनसंसदेची निवेदनाद्वारे मागणी


 शेती उपयोगी साहित्य विक्री करणारे दुकाने सुरू ठेवावीत 

भारतीय जन संसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांची मागणी

नगर (दि.15) : लॉक डाऊन च्या काळात शेती उपयोगी साहित्य विक्री करणारी दुकाने सुरू ठेवावी अशी मागणी भारतीय जन संसद चे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये कोरोना या महामारी मुळे बहुतेक सर्व दुकाने जनहितासाठी लॉकडाऊन मुळे बंद ठेवण्यात आली आहेत. यामध्ये शेती उपयोगी साहित्याची दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहेत. दुकाने बंद असल्यामुळे शेतकर्‍यांची व ग्रामपंचायतींची खूप मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. ग्रामपंचायतींना नियमितपणे पाणीपुरवठा करण्यासाठी छोट्या - मोठ्या साहित्याची खरेदी करावी लागते. 

सध्या दुकाने बंद असल्यामुळे साहित्य आणता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये पाणी पुरवठा योजना अडचणीत येत आहेत. ग्रामपंचायतीसमोर अडचणी निर्माण होत आहेत. तसेच जनतेला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारे शेतकर्‍यांना पिकासाठी पाणी देणे, जनावरांना पाणी पाजणे, स्वतः साठी व व कुटुंबियांसाठी पिण्याचे पाणी भरणे यासाठी मोटारी, पाईप, सॉकेट, सोल्युशन, सँडल पीस, नळ इ. साहित्य नेहमी हवे असते, मात्र दुकाने बंद असल्यामुळे हे साहित्य शेतकर्‍यांना मिळत नाही. शेतकर्‍यांची व ग्रामपंचायतीची अडचण होऊ नये यासाठी नगर जिल्ह्यामध्ये सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 पर्यंत सोशल डिस्टन्सिंग ठेवून व गर्दी न करता शेती उपयोगी पाईप प्लंबिंग व इतर दुकाने सुरू ठेवण्यात यावीत अशी मागणी सुधीर भद्रे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री यांनी सुद्धा शेती कामे बंद राहणार नाहीत असे सुचविले आहे. तसेच शेती उपयोगी साहित्याचा जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत समावेश असल्याने शेती उपयोगी साहित्याची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानांमध्ये येताना शेतकर्‍यांनी तोंडाला मास्कअथवा रुमाल बांधून यावे. दुकानांमध्ये साहित्य विक्री करणार्‍या मालक आणि कर्मचार्‍यांनीही तोंडाला मास्क अथवा रूमाल बांधावा. दुकान  मालकाने हात धुण्यासाठी पाणी, साबण, सॅनिटायजर इ.व्यवस्था स्वखर्चाने उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे येणार्‍या सर्व शेतकर्‍यांची नोंदवही ठेवण्यात यावी हे सर्व नियम पाळून दुकाने सुरु करण्यात यावीत अशी मागणी सर्वश्री अशोक सब्बन, अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक ढगे, कैलास पठारे, डॉ.प्रशांत शिंदे, वीर बहादुर प्रजापती, बबलु खोसला, भगवान जगताप व भारतीय जनसंसद चे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी जिल्हाधिकारी नगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post