नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत!

नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत!

विद्यार्थी, व्यापारी, पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा : विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे


| अहिल्यानगर | दि.11 ऑगस्ट 2025  | नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन अहिल्यानगर स्थानकावर रात्री ९.०० वाजता झाले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. या सेवेमुळे विद्यार्थी, व्यापारी व पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असून, वेळ व खर्च वाचणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बेंगळुरू–बेलगावी, अमृतसर–श्री माता वैष्णो देवी कटरा व गाडी क्रमांक ०१००१ नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस या तीन गाड्यांचा ध्वज फडकावून शुभारंभ करण्यात आला. नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे आगमन झाल्यानंतर झालेल्या स्वागत समारंभास खासदार निलेश लंके, रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक पदमसिंह जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता विकास कुमार, माजी महापौर अभिषेक कळमकर, अभय आगरकर, योगीराज गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

सभापती प्रा. शिंदे म्हणाले, परदेशातील रेल्वेच्या तुलनेत वंदे भारत सेवा सर्व बाबतीत उत्कृष्ट आहे. ही सेवा देशभर लोकप्रिय झाली आहे. नागपूर–पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे आहे. विद्यार्थी, व्यापारी व पर्यटकांसाठी ही सोयीची ठरणार आहे. पुण्याकडे जाताना रांजणगाव व सुपा परिसरापासून वाहतूक कोंडी सुरू होते. त्यामुळे वेळ व पैसा वाचेल आणि प्रवास अधिक सुखद व जलद होईल.संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे महामार्ग सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. तसेच, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या विनाकारण दौंडमार्गे जाण्याऐवजी थेट पुण्यात याव्यात, यासाठी अहिल्यानगर–संभाजीनगर–पुणे असा नवीन रेल्वेमार्ग व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी खासदार निलेश लंके यांनीही मनोगत व्यक्त केले. पदमसिंह जाधव यांनी वंदे भारत रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post