पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली, (दि.14) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी देशवासियांशी संवाद साधताना देशव्यापी लॉकडाऊन ३ मे पर्यंत कायम राहणार असल्याचे जाहीर केले. दरम्यानच्या काळात ‘कोरोना हॉटस्पॉट’ वाढले नाही, तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचे मूल्यांकन केले जाणार आहे. जे प्रदेश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तेथील नियम शिथील केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित केले. केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊनचा २१ दिवसाचा कार्यकाळ आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नेमकी काय घोषणा करतात याकडे देशाचे लक्ष होते. त्यानुसार मोदी यांनी आज लॉकडाऊनचा कार्यकाळ ३ मेपर्यंत राहील, असे आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
सात गोष्टींसाठी साथ द्या असे आवाहन
१. घरातील ज्येष्ठांची, विशेषत: ज्यांना जुना आजार आहे त्यांची जास्त काळजी घ्या.
२. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पाळा, घरगुती मास्क वापरा.
३. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या निर्देशांचे पालन करा. गरम पाणी, काढा प्या.
४. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करा, इतरांनाही प्रेरित करा
५. शक्य तेवढ्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या, भोजनाची व्यवस्था करा
६. आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. कोणालाही नोकरीवरुन काढू नका.
७. आपले डॉक्टर, नर्स, आरोग्यरक्षक, सफाई कर्मचारी यांचा मान राखा, त्यांचा गौरव करा.
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
* इतर देशांशी तुलना करण्याची वेळ नाही, पण आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात आहे.
* भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना केल्यास अंगावर शहारे येतात. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा मोठा लाभ झाला. या लॉकडाऊनची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली, पण जीवापुढे याचे मोल नाही.
* लॉकडाऊन काळात राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मोलाचे कार्य. कोरोना ज्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे सर्वजण आवक. लॉकडाऊन वाढवण्यात यावा हाच उपाय वारंवार समोर येतो आहे.
* पुढच्या काळात शिस्तीने वागणे आवश्यक आहे, अधिक सतर्कता बाळगायला हवी अन्यथा कठोर पावले उचलावी लागतील. नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणे महत्त्वाचे.
* २० एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचे मूल्यांकन. ज्या भागत हॉटस्पॉट वाढणार नाही, त्या ठिकाणी काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार करणार. याबाबत उद्या (बुधवारी) सरकार सविस्तर खुलासा करणार.
* पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांसाठी विशेष प्रयत्न:
* युवा वैज्ञानिकांनो पुढे या, कोरोनावर लस शोधा.