नगर : ‘नृत्यझंकार’, रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व लायन्स क्लब (मिडटाऊन) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आरोग्यवर्धिनी’च्या डॉ. हेमा सेलोत होत्या. कार्यक्रमास समितीचे सचिव गणेश गावडे, विश्वस्त व ’लायन्स‘चे अध्यक्ष अॅड. रवींद्र शितोळे, संपूर्णा सावंत व डॉ. कल्पना ठुबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी ‘नृत्यझंकार’च्या विद्यार्थिनींनी कथ्थक या शास्त्रीय नृत्य शैलीत गणेश वंदना, ताल त्रिताल व तराना यांची प्रस्तुती केली. स्त्री शक्ती व होलिकोत्सव यावर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. डॉ. हेमा सेलोत यांनी निकोप व निरोगी आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. एकात्मतेचा संदेश देणार्या आंतरभारती संस्थेच्या 8 फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमात सहभागी ‘नृत्यझंकार’च्या कलाकारांना यावेळी पारितोषिके देण्यात आली, तसेच मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक, मनोरंजन व आरोग्य अशी सुरेख सांगड घालण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
‘लायन्स’तर्फे खास महिलांसाठी लवकरच मोफत नृत्य व आरोग्यविषयक कार्यशाळा घेण्यात येईल, अशी घोषणा अॅड. रवींद्र शितोळे यांनी केली. या कार्यक्रमात तबल्यावर सुशील क्षत्रिय, हार्मोनिअम व गायनाची श्रद्धा देशपांडे आदींनी साथ केली. ‘नृत्यझंकार‘च्या संचालिका प्रिया ओगले-जोशी यांनी नृत्य दिग्दर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुश्री देशपांडे यांनी केले.
Tags:
Ahmednagar