मुंबई : चिकन खाल्याने कोरोनाची लागण होते, अशा प्रकारचे मेसेज सोशल मिडीयावर फिरत असल्याने याचा मोठा परिणाम हा पोल्ट्री उद्योगावर झाला असल्याचे दिसत आहे. कधी नव्हे इतक्या चिकनच्या किंमती कमी झाल्या आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र या कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसाय मोठ्या संकटात सापडला आहे.
राज्यातील शेतकर्यांनी शेतीला पर्याय म्हणून कुक्कुटपालन सुरु केले, बँकाकडून लाखोंचे कर्ज घेतले, शेड उभारले, पिलांची जपणूक केली. परंतु कोरोना व्हायरस आला काय शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. कोरोनाच्या अफवांमुळे पोल्ट्री फार्मचा बाजार उठला आहे. राज्यात असंख्य शेतकरी आहेत, त्या शेतकर्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.
संपूर्ण राज्यामध्ये दीड कोटी कोंबड्या विक्रीविना पडून असल्याची माहिती नाशिकचे आनंद अॅग्रोचे संचालक उद्धव आहिरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. त्यामुळे 8 दिवसांत महाराष्ट्रातील पोल्ट्रीचे तब्बल 600 कोटींचे नुकसान झाले आहे. तर आतापर्यंतच्या नुकसानाचा आकडा 900 कोटींच्या घरात गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोल्ट्री व्यवसायात देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नगर-नाशिक जिल्ह्यात सुमारे 80 लाखांहून अधिक कोंबड्या विक्री अभावी पडून असल्याची माहिती पुढे येत आहे. तर भाव कमी करुनही विक्री होत नसल्याने कोंबड्यांचे काय करायचे असा प्रश्न आता पोल्ट्री व्यावसायिकांना पडला आहे.
कुक्कुट पक्षी व नोव्हेल करोना विषाणूचा संबंध नाही : पशुसंवर्धन आयुक्तालयाचे स्पष्टीकरण
चीन व इतर देशागध्ये नोव्हेल करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर रामाज माध्यमातून प्रसारित झालेल्या अशास्त्रीय माहितीमुळे सामान्य नागरिकांत कुक्कुट मांस, अंडी व अन्य कुक्कुट उत्पादने यांच्या बदल गैरसगज निर्माण झाल्याने त्याचा विपरित परिणाम कुक्कुट व्यवसायावर होत आहे, मात्र, कुक्कुट पक्षी व नोव्हेल करोना विषाणूचा संबंध नसून कुक्कुट उत्पादने मानवीआहारासाठी संपुर्णपणे सुरक्षित आहेत तसेच त्यांच्या सेवनामुळे नोव्हेल करोना विषाणूचा प्रादुर्भाव होत नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी स्पष्ट केले आहे.
Tags:
Maharashtra
