पुणे येथे आढळलेल्या कोरोनाच्या दोन रुग्णांवर उपचार सुरू
नागरिकांनी घाबरून जाऊ नये; सतर्क रहावे : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
मुंबई : कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आज पुणे येथे आढळून आले. दोघांवर लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.
दुबईहून आलेल्या या दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधील विलगिकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे.
धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा,अशी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री यांनी केले आहे.
कोरोनाच्या संशयित रुग्णावर लक्षणांवर आधारित उपचार केले जात असून केरळ येथेही तीन रुग्ण आढळून आले होते त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांचे नमुने पुन्हा निगेटीव्ह आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
Tags:
Maharashtra
