नगर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिव छत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे सोबत पॅरामोटर मध्ये बसून पुणे येथील तारकेश्वरी दिनेश राठोड या गर्भवती महिलेने तब्बल दोन हजार पाचशे फूट उंच भरारी घेतली व तब्बल अकरा किलोमीटर लांब हवेतून साहसी भ्रमंती करून महिला कोणत्याही अवस्थेत साहस करू शकतात हा जागतिक महिला दिन निमित्त संदेश देत महिलांना साहसी खेळा कडे आकर्षित करण्यासाठी प्रेरणा दिली.
नॅशनल ऍडव्हेंचर फाऊंडेशन चॅप्टर शिर्डी चे वतीने राहुरी एम आय डी सी परिसरात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साहसी महिलांना पॅरामोटर च्या साहायाने हवेत भ्रमंती करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
पुणे येथील सहा महिन्याच्या गर्भवती असलेल्या तारकेश्वरी दिनेश राठोड या साहसी भगिणीने या महिला दिनाच्या साहसी उपक्रमात आपला सहभाग नोंदविला व आप्पासाहेब ढुस यांचे सोबत पॅरामोटर मध्ये बसून राहुरी एम.आय.डी.सी परिसरातून सकाळी ठीक 07:10 वाजता पती दिनेश राठोड व काही महिलांच्या साक्षीने उड्डाण घेतले. समुद्र सपाटी पासून तब्बल दोन हजार पाचशे फूट उंचा वरून राहुरी एम .आय.डी.सी ते चिंचविहिरे, नंतर राहुरी फॅक्टरी - जोगेश्वरी आखाडा - काळे आखाडा मार्गे पुन्हा एम आय डी सी परिसर असा 65 किमी वेगाने तब्बल अकरा किमी अंतर हवेतून चित्तथरारक प्रवास करून 07:30 वाजता वीस मिनिटांनी लँडिंग केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तारकेश्वरी राठोड यांनी गर्भावस्थेत हे साहस दाखवून महिला कोणत्याही अवस्थेत साहस करू शकतात व महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे दाखवून देत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हे साहसी उड्डाण यशस्वी करण्यासाठी तारकेश्वरी यांचे पती दिनेश राठोड, ग्लोबल इंग्लिश मेडिअम स्कूलचे सौ.सारिका व श्री. रामकीसन ढोकणे, प्रसाद ढुस, जेम्स पाळंदे, बाबासाहेब क्षीरसागर आदींचे अनमोल सहकार्य लाभले.
Tags:
Ahmednagar

