सुसंस्कारांनीच अत्याचाराच्या घटना टळतील : दीपालीताई बारस्कर
टॉडलर टाऊन प्री-स्कूलमध्ये शिवजयंती थाटात साजरी
नगर (दि.21) : छत्रपतींनी सर्व जाती-धर्मांचा कायमच आदर केला. राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले. त्या संस्काराचा उपयोग महाराजांनी स्वराज्यातील रयतेसाठी केला. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर बालपणीच चांगले संस्कार करावेत. सुसंस्कारांनीच अन्याय-अत्याचारांच्या घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन नगरसेविका दीपालाताई बारस्कर यांनी केले.
सावेडीतील डोकेनगर येथील टॉडलर टाऊन प्री-स्कूलमध्ये आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. प्राचार्या उर्मिला सायंबर यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. नुकत्याच झालेल्या आंतरशालेय फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बारस्कर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
प्राचार्या सायंबर म्हणाल्या की, शिवरायांनी स्वराज्यनिर्मिती करताना ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या उक्तीप्रमाणे आचरण केले. त्यांनी जनतेवर कधीच अन्याय होऊ दिला नाही. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन जाती-पातीला अजिबात थारा देऊ नये. प्रामाणिकपणे अभ्यास करून यश मिळवावे. स्वतःबरोबरच पालक व शाळेचे नाव उंचवावे.
विद्यार्थ्यांनी जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, येसूबाई, सोयरा राणीसाहेब, आणि मावळे यांच्या वेषभूषा परिधान केल्या होत्या. त्यांनी आपापल्या पात्रांचा परिचय करून देत उपस्थितांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमासाठी शिक्षिका शिक्षिका प्रीती पाठक, मनिषा मनगुटकर, सुवर्णा गारूळे, राखी धोंडगे, किरण औटी यांनी परिश्रम घेतले. या वेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags:
Ahmednagar
