| छत्रपती संभाजीनगर | दि.20 नोव्हेंबर 2025 | निर्भीड व उत्तुंग विचारांचे मराठी साहित्यिकांचे विचारपीठ साप्ताहिक झेपच्या वतीने वाड्:मयीन संस्कृती दृढ व्हावी या हेतूने दरवर्षी कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झेप साहित्य संमेलन आयोजिण्यात येते.यावर्षी हे संमेलन २१ डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झेप पुरस्कार निवड समिती अध्यक्ष श्रीमती ए .बी .साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साहित्यिक डॉ.ऋषीकेश कांबळे यांनी सुचवल्यानुसार प्रख्यात व्याख्याते, लेखक,कवी तथा विचारवंत डॉ.शिवानंद भानुसे यांची निवड करण्यात आली.
डॉ.शिवानंद भानुसे हे संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात मराठी विभागात कार्यरत आहेत. डॉ.शिवानंद भानुसे यांनी वक्तृत्व:तंत्र आणि मंत्र,प्रायोगिक वक्तृत्व ,कवितेतील स्री प्रतिमा,साहित्याचा चिकित्सक अभ्यास आदी ग्रंथाचे लिखान केले आहे. विविध साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग नोंदवला आहे. हजारो व्याख्याने दिली आहेत.
झेप आयोजित संविधान अमृत महोत्सव सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी संबोधित केले आहे. फुले- शाहू - आंबेडकर, यांची विचाधारा अंगीकारून ते कार्य करीत आहेत. सभेत कसे बोलावे, प्रभावी सूत्रसंचालन, तारुण्यातच फुलतं कर्तृत्व, घडवू शकतो इतिहास फक्त तरुणच, आजची शिक्षणपध्दती चित्र आणि वास्तव, राजकीय व सामाजिक अस्थिरता शोध आणि बोध, व्यक्तिमत्व विकास, प्रत्येक क्षण जगण्यासाठी, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी उपाययोजना, संविधानाचा अमृत महोत्सव आणि मानवी मूल्य. आदी विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत.
वैचारिक, ललित, समीक्षात्मक लेखनही ते सध्या करीत आहेत. विविध दैनिकं ,साप्ताहिकं नियतकालिका मधून सातत्याने त्यांचे लेख प्रकाशित होत आहे. तसेच विविध टी.व्ही. चॅनेलवर राजकीय, सामाजिक विश्लेषक म्हणून आणि भारतीय राज्यघटनेचे व आरक्षण अभ्यासक म्हणून ते सातत्याने सहभागी असतात. समाजरत्न पुरस्कार, शब्दप्रभू पुरस्कार, उत्कृष्ट वक्ता पुरस्कार, तापी -पुर्णा पुरस्कार, राष्ट्रीय उत्कृष्ट वक्ता पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, ज्ञानाचार्य पुरस्कार,आदर्श शिक्षक पुरस्कारा सोबतच राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
मराठवाडा युवा साहित्य संघ कार्याध्यक्ष, बोलावे कसे अकादमी सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य वक्तृत्व प्रतिष्ठाण अध्यक्ष, विदर्भ मित्रमंडळ अध्यक्ष या पदासह सामाजिक चळवळीतील अनेक पदे ते सध्या ते भूषवित आहेत. त्यांना वक्तृत्त्व स्पर्धेत सुवर्ण पदक, दिल्ली येथील राष्ट्रीय वक्तृत्त्व स्पर्धेत पंचवीस हजारांंचे पारितोषिक, शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानित, दुरदर्शनच्या थेट प्रक्षेपण महाचर्चेत सहभाग, इटीव्ही मराठीवरील कार्यक्रमात काव्यवाचन, तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते दिल्लीत सन्मानीत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी शेकडो वक्तृत्व, वादविवाद,काव्यवाचन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या संमेलनात कवयित्री हरणाबाई जाधव वाड्:मय पुरस्कार , शाहीर नारायण जाधव समाजभूषण पुरस्कार वितरण, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिसंवाद, पुस्तक प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, ग्रंथ प्रकाशन आदी भरगच्च वाड् :मयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजक डॉ.डी. एन. जाधव, डॉ.मिलींद रणवीर, डॉ.राजेंद्र शेजूळ, डॉ.बलराज पांडवे, डॉ.सावली राऊत, सुर्यकांत तेलगोटे, उषाताई घायतडक , राजकन्या पायके, रुपकांत घनघावे यांनी दिली आहे.
