मिरजगाव पोलिसांची कामगिरी; 15 लाखाचा मुद्देमाल जप्त
दरोडा टाकून डिझेल चोरणारी टोळी गजाआड
। अहिल्यानगर । 18 फेब्रुवारी 2026 । दरोडा टाकून डिझेल चोरी करणारी टोळी मिरजगाव पोलिसांनी जेरबंद केली. या कारवाईत 15 लाख 15 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय झंजाड, सुनील माळशिखरे, विकास चंदन, गणेश ठोंबरे, सुनील खैरे, गोकुळ पळसे, राजेंद्र गाडे, बळीराम काकडे, अशोक रक्ताटे, नितीन शिंदे, राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोहेकॉ अशोक रक्ताटे, पोकॉ राजेंद्र गाडे हे पेट्रोलिंग करीत असताना एक स्वीफ्ट कार व स्कॉर्पिओ भरधाव वेगात जाताना दिसली.
रक्ताटे व गाडे यांनी या दोन्ही वाहनांचा पाठलाग केला. स्विफ्ट कार तिखी शिवारात मिरजगाव ते कडा रस्त्यावर एका पोलला धडकली. कारमधील 3 जण कार सोडून पळून गेले. स्कॉर्पिओचा पाठलाग केला असता स्कॉर्पिओ आष्टीच्या (जि.बीड) दिशेने पळून गेली. स्वीफ्ट कारमध्ये डिझेल चोरीचे साहित्य, ड्रम, पाईप व 3 कोयते मिळून आले.
गाडी सोडून पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला. भगवान गोवर्धन पठारे (वय 40 रा. सालेवडगाव, ता. आष्टी, जि. बीड), सुनील प्रमोद श्रीवास्तव (वय 40, रा. खाडवानाका, तेजाजीनगर, इंदूर), गणेश नवनाथ दहातोंडे (वय 20, सालेवडगाव, ता. आष्टी), आकाश दत्तू मोरे (वय 34, रा. नांदगाव, जि. नाशिक, हल्ली रा. निमगाव चोभा, ता. आष्टी) यांना अटक केली.
या कारवाईत एक स्कॉर्पिओ (एमएच 15 जीआर 2882), एक स्वीफ्ट कार( एमएच 14 सीसी 6977), तीन मोबाईल, 7 ड्रम, डिझेल काढण्यासाठी लागणारे दोन पाईप, 3 कोयते, दोन मिरची पुड्या, एक दोरी असा एकूण 15 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी मिरजगाव, कर्जत, जामखेड परिसरात डिझेल चोरीचे 18 ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली.
