वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग; शेतकर्‍याचे मोठे नुकसान...

वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग; शेतकर्‍याचे मोठे नुकसान

खडकीत एक एकर गहू जळाला

। अहिल्यानगर । दि.10 मार्च 2026 ।  प्रमाणापेक्षा जास्त लूज असणार्‍या वीजवाहक तारा एकमेकांना चिटल्याने लागलेल्या आगीत खडकी (ता. अहिल्यानगर) येथील रोहिणी प्रकाश निकम यांच्या शेतातील एक एकर पेक्षा जास्त गहू जळून गेला. त्यामध्ये त्यांचे एक लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.ही घटना सोमवारी दुपारी घडली.

खडकी गावठाण शेजारी रोहिणी प्रकाश निकम यांचे गट नंबर 15 चे क्षेत्र आहे. यामध्ये गहू असून तो काढणीला आला आहे. या शेतातून जाणार्‍या वीजवाहक तारा खूपच खाली आलेल्या आहेत. या तारा व्यवस्थित कराव्यात, अशी मागणी त्यांनी वारंवार महावितरण कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे केलेली होती. पण कोणीही त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. 

सोमवारी दुपारी अडीचच्या दरम्यान या वीजवाहक तारा एकमेकांना चिटल्याने आगीचे लोळ गव्हाच्या पिकात पडले. काढणीला आलेला गहू पूर्णपणे वळलेला असल्याने गव्हाने पेट घेतला आणि आग वाढत गेली. 

गव्हाचे शेत गावाच्या जवळ असल्याने .गावातील  चंद्रकांत कोठुळे, अमित सुडगे, राहुल कोठुळे, तनवीर शेख, सुधाकर उमाप, केतन निकम, सुनिल कोठुळे, केतन रोकडे, निखिल निकम, हे धावत गव्हाच्या शेतात शिरले आणि त्यांनी आग विझवली. पण तोपर्यंत एक एकर पेक्षा जास्त गव्हाचे पीक जळून गेले होते. यामुळे रोहिणी प्रकाश निकम यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post