स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे आवाहन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक

जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे आवाहन


| अहिल्यानगर | दि.20 नोव्हेंबर २०२५ |  जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीकडून इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी संबंधित अधिनियमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेश व सूचनांनुसार उमेदवारांनी कार्य करणे आवश्यक आहे.

सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रमाणीकरण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफ.एम. वाहिन्या, चित्रपटगृहे, बल्क एस.एम.एस., व्हॉइस एस.एम.एस., संकेतस्थळे आदींचा समावेश होतो.

समाजमाध्यमे (सोशल मीडिया) यात इंटरनेटद्वारे वापरली जाणारी संवादाची व माहितीची व्यासपीठे समाविष्ट होतात, ज्याद्वारे लोक एकमेकांशी संवाद साधतात, माहिती शेअर करतात, प्रतिक्रिया व्यक्त करतात, मते किंवा विचार मांडतात आणि विविध प्रकारची माहिती (फोटो, व्हिडिओ, लेख, बातम्या) इतरांपर्यंत पोहोचवतात. उदा. एक्स (पूर्वीचे ट्विटर), फेसबुक, लिंक्डइन, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म्स, मायक्रो ब्लॉगिंग साइट्स, मेसेजिंग ॲप्स (व्हॉटसॲप, टेलिग्राम) तसेच कोलॅबोरेटिव्ह टूल्स (विकी, डिस्कशन फोरम्स) इत्यादींचा समावेश होतो.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीत जिल्हाधिकारी  हे अध्यक्ष आहेत. या समितीत पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अपर जिल्हाधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित तहसीलदार अथवा नगरपरिषद/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी प्रमाणीकरण करून घेण्यासाठी त्या जाहिराती जिल्हा माहिती अधिकारी (जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी रोड, अहिल्यानगर) यांच्याकडे सादर कराव्यात. प्रस्तावित जाहिरात प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या प्रमाणीकरणासाठी अर्ज करावा लागेल.


पूर्व प्रमाणीकरणाच्या अर्जासोबत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडाव्यात, असेही आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post