| नागपूर | दि.०४ ऑगस्ट २०२५ | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी रविवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८:४६ वाजता देण्यात आली. धमकीच्या फोननंतर पोलिसांनी तत्काळ पावले उचलत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश विष्णु राऊत (राहणार तुलसीबाग रोड, महल, नागपूर) या संशयिताने गडकरींच्या घराला बॉम्बने उडवण्याचा फोन केला होता. तो मेडिकल चौकाजवळील एका देशी दारूच्या दुकानात काम करत होता.
👉 ...राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल
त्याने स्वतःच्या मोबाईलवरून कॉल करून १० मिनिटांत गडकरींचे घर उडवून देण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी बीमा रुग्णालयाजवळून त्याला ताब्यात घेतले. धमकीच्या कॉलनंतर पोलिसांनी स्थानिक पोलिस ठाण्याला आणि बॉम्ब शोध पथकाला तत्काळ माहिती दिली.
गडकरी यांच्या निवासस्थानी कसून तपासणी करण्यात आली, मात्र कोणताही स्फोटक पदार्थ आढळला नाही. त्यामुळे हा कॉल खोटा असल्याचे स्पष्ट झाले. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात यापूर्वी अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल आले होते.