जिल्ह्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयात मिळकतींची दस्तनोंदणी
। अहिल्यानगर । दि.08 मे 2025 । शासनाच्या 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' उपक्रमामुळे नागरिकांना कुठल्याही तालुक्यातील मिळकतीची दस्तनोंदणी जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात करता येणार आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महेंद्र एस.महाबरे यांनी दिली आहे.
शासनाने १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून एक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम १ मे पासून सुरु केला आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातील समाविष्ट सर्व तालुक्यातील कुठल्याही गावाचे, मौजेचा दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदविता येणार आहेत. हा उपक्रम यशस्वी झाल्यावर पुढील काळात 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशन' यावर अंमलबजावणी होणार असून यामुळे जनतेची कामे सुलभरित्या होण्यास मदत होणार आहे.
एक जिल्हा, एक नोंदणीसाठी शासनाने जिल्ह्यातील सर्व नोंदणी अधिकारी यांचे पदनाम सह दुय्यम निबंधक असे केले आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणी अधिकारी यांचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण जिल्हा करण्यात आले असून तशा सुधारणा करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी प्रत्येक तालुक्यातील नोंदणी कार्यालयात नोंदविणे बंधनकारक होते. एक जिल्हा एक नोंदणी अंतर्गत जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील मिळकतीचा दस्त हा जिल्ह्यातील कुठल्याही अन्य तालुक्यातील नोंदणी कार्यालयात नोंदविता येणार आहे.
एक जिल्हा, एक नोंदणी ही 'वन स्टेट वन रजिस्ट्रेशनची' पहिली पायरी असून जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील मिळकतीच्या दस्ताची नोंदणी जनतेला जिल्ह्यातील सोयीच्या कुठल्याही तालुक्यात करता येणार आहे. सूची क्रमांक २ वर गावाचे नाव, तालुका व जिल्हा नमूद असणार असल्याने शोध घेणेही सुलभ होणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.