राजूर गावात हिपॅटायटीसचा प्रादुर्भाव!

 राजूर गावात हिपॅटायटीसचा प्रादुर्भाव!

आरोग्य विभागाचे प्रतिबंधात्मक उपाय सुरू

। अकोले/राजूर । दि.26 एप्रिल 2025 । राजूर (ता. अकोले) या गावात हिपॅटायटीस आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. गावातील पाण्याच्या उपचार केंद्राच्या कार्यक्षमतेत झालेल्या त्रुटीमुळे हा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. सद्यस्थितीत गावात ९७ रुग्णांमध्ये आजाराची लक्षणे आढळून आली आहेत.

या परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नंदकुमार नेहरकर गटविकास अधिकारी श्री. अमर माने आणि आरोग्य अधिकारी डॉ. श्याम शेटे यांनी राजूर गावातील पाण्याच्या शुद्धीकरण केंद्रास तसेच ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

श्री. आशिष येरेकर यांनी पाणी शुद्धीकरण केंद्रास तातडीने दुरुस्त करून दोन दिवसांत कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व रुग्णांवर तातडीने योग्य उपचार करण्याच्या व त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावात नवीन रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण मोहीमही सुरू करण्यात आली आहे.

आरोग्य विभागामार्फत रुग्णांचे योग्य उपचार,  आरोग्य शिक्षण व पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याचे विविध उपाय तातडीने राबवले जात आहेत. सोबतच आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांचेमार्फत मेडिक्लोर पुरवठा आणि जनजागृतीसाठी हस्तपत्रिका घरोघर वाटप करण्यात येत आहेत.


गावकऱ्यांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे व पाणी उकळूनच वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post