'तुकाई' उपसा सिंचन योजनेसाठी ७.५० कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता

'तुकाई' उपसा सिंचन योजनेसाठी ७.५० कोटी रुपयांच्या निधी वितरणास  मान्यता

। मुंबई । दि.01 एप्रिल 2025। महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 'तुकाई' उपसा सिंचन योजनेसाठी ५९९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने ७ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तुकाई योजनेला चालना मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना प्रलंबित मागणी पूर्ण होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या नवीन व प्रगतीपथावरील लघुसिंचन प्रकल्पांसाठी शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित केला होता. वित्त विभागाच्या सुधारित अंदाजाच्या मर्यादेत हा निधी वितरित करण्यात येत असून, 'तुकाई' प्रकल्पाला यातील ७ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या योजनेंतर्गत कर्जत परिसरातील २४ पाझर तलाव आणि ३ ल.पा.तलाव भरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना  याचा लाभ होणार आहे. एकूण १९  गावातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.  परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता प्रा. राम शिंदे यांनी विधानभवनात  वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत योजनेसंदर्भात बैठकही घेतली होती आणि  योजनेसाठी निधी वितरीत करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या होत्या.  या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून सिंचन व्यवस्थेचा विकास होऊन शेती उत्पादनात वाढ होईल.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग 

👉 विजयमार्ग सबक्राईब करा....  


Post a Comment

Previous Post Next Post