पाच लाखावरील ठेवींसाठी संघटीत शक्ती उभारणार
अर्बनच्या ठेवीदारांची 15 रोजी नगरमध्ये बैठक
। अहिल्यानगर । दि.10 डिसेंबर 2024 । नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची येत्या रविवारी (दि. 15) सकाळी 11 वाजता महाजन गल्ली येथील गायत्री मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बँक बचाव कृती समितीचे डी. एम. कुलकर्णी यांनी दिली. पाच लाखावरील ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदारांची संघटीत शक्ती उभारण्याची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
ठेवीदारांनी बँकेच्या संघर्ष समितीकडे पाठ फिरवल्याने ठेवीदारांच्या दृष्टीने हालचाली थंडावल्या आहेत. विधानसभा निवडणूक व इतर कामांमुळे पोलिस दलाकडून बँकेच्या घोटाळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. तसेच पोलिस दलाने जप्त केलेल्या प्रॉपर्टीची लिलाव प्रक्रियाही पूर्णपणे दुर्लक्षित झाली आहे. पाच लाखाच्या आतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या रकमा प्राप्त झाल्या आहेत.
मात्र, त्यापैकी कोणीही ठेवीदारांनी रक्कम प्राप्त झाल्याची माहिती संघर्ष समितीला देण्याची तसदी घेतली नाही. काही दिवसांपासून बँकेच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी ठेवीदारांना ठेवी देण्यासाठी बँकेकडे पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही.
मध्यंतरी काही ठेवीदारांनी त्यांच्या ठेवीच्या रकमा मिळण्यासाठी अवसायकांची भेट घेऊन ठेवींच्या रकमांची मागणी करताना अवसायकांशी वाद घातला. दरम्यान, बँकेच्या सत्य परिस्थतीची माहिती देण्यासाठी व ठेवीदारांमध्ये नवीन उर्जा भरण्यासाठी दि. 15 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे कुलकर्णी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.