रस्त्यांची खोदाई करून नुकसान करणार्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणार
महानगरपालिकेकडून रस्त्यांच्या तपासणीसाठी प्रभाग समितीनिहाय स्वतंत्र पथकाची नियुक्ती
रस्त्यांचे रक्षण करणे ही महानगरपालिकेसह नागरिकांची सामूहिक जबाबदारी : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
| अहिल्यानगर | दि.१४ ऑगस्ट २०२५ | शहरात सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, काही ठिकाणी रस्त्यांची कामे झाल्यानंतर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता परस्पर रस्त्याची खोदाई करून नुकसान केल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे अशा व्यक्तींवर आता दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यांची नियमित तपासणी करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. रस्त्यांचे रक्षण करणे ही महानगरपालिकेसह नागरिकांची सामूहिक जबाबदारी, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांच्या कामांसाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या पाठपुराव्यातून १५० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून २४ प्रमुख रस्त्यांची कामे प्रस्तावित असून, त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय, महानगरपालिकेच्या स्वतःच्या उत्पन्नातून देखील अनेक रस्त्यांची नव्याने कामे करण्यात आली आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
अलीकडील काळात काही व्यक्ती व संस्था विनापरवाना खोदाई करून या नव्याने केलेल्या रस्त्यांचे नुकसान करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
रस्त्यांच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित पथक प्रभाग समितीनिहाय नियमित गस्त घालून रस्त्यांच्या देखभालीसंबंधी अहवाल सादर करणार आहे. रस्त्यांच्या खोदाईसंबंधी कोणतीही कामे करण्यासाठी महानगरपालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून, नियमभंग करणार्यांविरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
नागरिकांनी विकासकामांचे संरक्षण करणे ही त्यांची व महानगरपालिकेची सामूहिक जबाबदारी आहे. नव्याने बांधलेले रस्ते ही शहराच्या प्रगतीची पायरी आहे. यापुढे नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. रस्त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि संशयास्पद किंवा विनापरवाना खोदाईची तात्काळ माहिती महानगरपालिका नियंत्रण कक्षास कळवावी, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग