| पुणे | दि.15 जुन 2024 | यावर्षी राज्यातील पर्जन्यमान चांगले असण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून शेतकऱ्यांना पेरणीबाबत मार्गदर्शन करण्यासोबत बी-बियाणे आणि पत पुरवठा वेळेवर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विधान भवन पुणे येथे झालेल्या मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे प्र.पोलीस आयुक्त सुनील रामानंद, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, खते आणि बियाण्यांबाबत शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. बँकांकडून शेतकऱ्यांना पतपुरवठा वेळेवर होईल याकडे लक्ष द्यावे. वेळेवर पतपुरवठा झाल्यास त्यांना कृषी निविष्ठा घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल. बोगस खते आणि बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
पाऊस चांगला असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना पेरणी करण्याविषयी मार्गदर्शन करावे. त्यांना पेरणीसाठी आवश्यक बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. ऊस पाचटबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साखर कारखान्यांचे सहकार्य करण्यात यावे. शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Tags:
Maharashtra
