जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी शिबिराचे आयोजन

जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी ११ व १३ एप्रिलला  शिबिराचे आयोजन

। अहिल्यानगर । दि.10 एप्रिल 2026 ।  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहिल्यानगर यांच्या वतीने दि. ११ व १३ एप्रिल २०२६ रोजी त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत  समिती कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्षा व अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रेश्मा माळी, उपायुक्त राकेश पाटील व सदस्य सचिव अनिल तिदमे यांनी केले आहे.


सामाजिक समता सप्ताहातील  विशेष उपक्रमांतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. समितीकडे सादर झालेल्या व तांत्रिक त्रुटींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील अर्जदारांना यामधून संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन प्रणालीद्वारे त्रुटी कळवूनही अद्याप पूर्तता न केलेल्या अर्जदारांसाठी ही अंतिम संधी मानली जात आहे.


इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव ऑनलाइन सादर करून आवश्यक कागदपत्रांच्या प्रती समितीच्या नागरी सुविधा केंद्रात तात्काळ जमा कराव्यात, यामुळे जून-जुलै महिन्यात प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्रासाठी होणारी धावपळ टाळता येणार आहे.


अर्ज प्रक्रियेदरम्यान त्रयस्थ व्यक्तींवर अवलंबून राहू नये, तसेच अर्ज भरताना स्वतःचा किंवा पालकांचा अचूक ई-मेल आयडी व दूरध्वनी क्रमांक नमूद करावा,  शपथपत्रातील वंशावळ संबंधित अधिकृत कागदपत्रांच्या आधारेच तयार करावी, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post