निळवंडेच्या उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्यातून २५ एप्रिलपासून पाणी सुटणार
पालकमंत्र्यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा
। शिर्डी । दि.14 एप्रिल 2026 । अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून १५ एप्रिलपासून पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. तसेच डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
उन्हाची वाढती तीव्रता, लाभक्षेत्रातील गावांमध्ये निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.उच्चस्तरीय कालव्यावरील शेतकऱ्यांनाही या पाण्याचा लाभ मिळावा, ही मागणी पालकमंत्र्यांनी संवेदनशीलतेने मान्य केली आहे. यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतीच श्री.विखे पाटील यांची भेट घेऊन आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नियोजित वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
