। जालना । दि.26 फेब्रुवारी 2024 । मनोज जरांगे यांनी रविवारी आंतरवली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेबरोबरच भाजपातील काही नेत्यांचीही नावे घेतली.
मनोज जरांगे यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे व पंकजा मुंडे यांची नावे घेतली. एकनाथ खडसे कधीच भाजप सोडू शकत नव्हते. त्यांच्यावर सोडायची वेळ आली. विनोद तावडे कधीच महाराष्ट्रातून बाहेर जाऊ शकत नव्हते, त्यांना दिल्लीला जावे लागले. नाना पटोले कधीच भाजप सोडू शकत नव्हते, त्यांना जावे लागले.
पंकजा मुंडे, त्यांचे वडील व मामा आयुष्यात भाजपा सोडू शकत नाहीत. आज त्यांची अवस्था काय आहे. जो कधीच पक्ष सोडू शकत नाही, त्यांनाही फडणवीसांमुळे पक्ष सोडावे लागले आहे. ज्यांची नावं आली आहेत, त्यांनी शांतपणे फक्त मान हलवून तरी मान्य करावे, असे जरांगे म्हणाले.
महादेव जानकरांना ते कधीच धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देणार नाहीत. जीव गेला तरी प्रफुल्ल पटेल आयुष्यात राष्ट्रवादी सोडू शकत नव्हते. पण तुरुंगाचा एवढा धाक दाखवला की त्यांना ते करावं लागलं.
अजित पवार कधीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकत नव्हते. पण नाईलाज इतका केला, की तुरुंगात जाण्यापेक्षा यांच्यासोबत गेलेलं बरं म्हणत तेही गेले, असा दावा जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
Tags:
Breaking
