। अहमदनगर । दि.10 ऑगस्ट 2023 । अहमदनगरच्या यश शाह याने पुणे येथील मॉडर्न कॉम्प्लेक्स येथे नुकत्याच झालेल्या योनेक्स-सनराईज प्रायोजित वि.वि.नातू ऑल इंडिया मानांकनाच्या सिनियर गटाच्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ऐकेरी गटात पात्रता फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेतून यशला बॅडमिंटनचे सिनियर गटाचे अखिल भारतीय पातळीवरील 84 वे स्थान प्राप्त झाले असून यामुळे यश आता आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवडीस पात्र झाला असून, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या सॉफ्टवेअरमध्ये मालदीव येथे 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवडक खेळाडूंच्या यादीत यशचे नाव समाविष्ट झाले आहे. व यश या स्पर्धेत सहभागी होत आहे.
यश गेल्या 11 वर्षांपासून बॅडमिंटन खेळाचा सराव करत असून नगर नंतर पुणे येथे गेल्या चार वर्षांपासून कोच चैतन्य नाईक संचालित सी.एन.बी.ए या बॅडमिंटन ऍकॅडमीमध्ये सातत्याने सराव करत आहे. तर फिटनेसचे ट्रेंनिंग कोच मिहीर तेहरणीकर याच्याकडे घेत आहे. यशने या अगोदर राज्याचे 17 व 19 वयोगटाचे एकेरीचे व दुहेरीचे विजेतेपद हि मिळवले असून राष्ट्रीय पातळीवरील विविध गटातील बॅडमिंटन स्पर्धेत त्याने प्राविण्य मिळवले आहे.
अ.भा.पातळीवरील खेलो-इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी यशची या अगोदर दोनदा निवड झाली आहे. यंदाच्या वर्षी पुणे जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी गटाचे विजेतेपद व एकेरीत उपविजेतेपद देखील यशने मिळवले आहे. मागील वर्षी नागपूर येथे झालेल्या आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात यशला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मालदीव येथील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्याचा मान नगरच्या यशला मिळाला असून या स्पर्धेत इंडोनेशिया, भूतान, कॅनडा, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, इंग्लंड येथील खेळाडूंचा समावेश आहे.
Tags:
Ahmednagar
