। अहमदनगर । दि.15 नोव्हेंंबर । जमीन मोजणीचा सुधारित नकाशा देण्याकरिता तक्रारदाराकडून आठ हजार रूपयाची लाच घेताना शेवगाव भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक प्रदीप शंकर महाशिकारे (वय 46) याला रंगेहाथ पकडले. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी शेवगाव-ताजनापूर रोडवरील स्मशानभूमीजवळ ही कारवाई केले.
अमरापूर (ता. शेवगाव) येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या अमरापूर शिवारातील शेत गट नं. 180 मधील 21 गुंठे जमिनीची भुमी अभिलेख कार्यालय, शेवगाव यांच्याकडून मोजणी करून घेतली होती.
मोजणीनुसार खातेदार यांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविन्यात आल्या होत्या. त्याचा सुधारित नकाशा देण्याकरिता यातील भूकर मापक प्रदीप महाशिकारे याने तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रूपये लाचेची मागणी केली होती.
तशी तक्रार तक्रारदार यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये महाशिकारे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 10 हजार लाचेची मागणी करून तडजोडी अंती आठ हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.
त्यावरून सोमवारी शेवगाव-ताजनापूर रोड वरील स्मशानभूमी जवळ आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान महाशिकारे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडुन आठ हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, वैभव पांढरे, रवींद्र निमसे, सचिन सुद्रुक, आसाराम बटुळे , हरून शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली
Tags:
Breaking