आठ मोटारसायकली चोरणारे दोघे गजाआड

। अहमदनगर । दि.29 ऑक्टोबर ।  शहरासह परिसरातून आठ मोटारसायकली चोरी करणार्‍या दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. संदीप उर्फ पिंट्या पांडुरंग खेडकर (वय 41, रा. घाटशिळ पारगाव, शिरुर कासार, ता. शिरुर, जिल्हा बीड) व सागर उर्फ पप्पू वसंत गिते (वय 23, रा. लोहसर खांडगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 

त्यांच्याकडून दोन लाख 20 हजार रुपयांच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील शिवाजी अर्जुन साबळे (वय 40 रा. इंदिरानगर, भिंगार, अहमदनगर) यांची होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एमएच 20 ईझेड 5101 ही सिव्हील हॉस्पीटलच्या पार्किगमधून अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. 

त्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत पोनि कटके यांनी आदेश दिले होते. सदर चोरी ही संदीप खेडकर व सागर गिते या दोघांनी केल्याची माहिती पोनि कटके यांना मिळाली. 

त्यानुसार सपोनि दिनकर मुंडे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ बापूसाहेब फोलाणे, पोना शंकर चौधरी, दिलीप शिंदे, भिमराज खर्से, पोकॉ योगेश सातपुते, पोकॉ विनोद मासाळकर, चापोहेकॉ संभाजी कोतकर अशांनी नगर-पाथर्डी रोडवरील चाँदबीबी महाल पायथ्याशी सापळा लावून वरील दोघांना पकडले. 

ताब्यात असलेल्या मोटारसायकलचे कागदपत्रे व ड्राायव्हींग लायसन्सबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या दोघांनी सदरची मोटार सायकल ही सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर आवारातून चोरी केली आहे. व शहरासह परिसरातून आणखी सात अशा एकुण आठ मोटारसायकली चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. 

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक साहेब, अहमदनगर, उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post