मराठी फलक न लावणार्या दुकानदारांना नोटीसा
पहिल्याच दिवशी पालिकेकडून 2 हजार 158 दुकानांची झाडाझडती
। मुंबई । दि.12 ऑक्टोबर । मराठी पाट्या लावण्याबाबत सांगूनही अनेक दुकानदारांनी अद्याप या पाट्या बदललेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेने मंगळवारपासून मुंबईतील दुकानांची तपासणी सुरु केले असून पहिल्याच दिवशी 2 हजार 158 दुकानांची झाडाझडती घेण्यात आली.
त्यावेळी 522 जणांनी मराठी पाट्या न लावल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांना पुढील आठवडाभरात दुकानाबाहेर मराठी पाट्या बदलल्या नाहीत तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मराठी भाषेतून ठळक अक्षरात नामफलक लावणी बंधनकारक आहे. याबाबत दुकानदारांना प्रशासनाकडून प्रथम 31 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, व्यापारी संघटनांनी कोरोनाचे कारण पुढे करत तीनवेळा मुदत वाढवून घेतली.
ही अंतिम मुदत 30 सप्टेंबर रोजी संपल्याने पालिकेने कारवाईला सुरवात केली. त्यावेळी व्यापार्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने व्यापारी संघटनांनी पालिकेच्या कारवाईच्या निर्णयाविरोधात सर्वोच्य न्यायालयातही धाव घेतली.
मात्र कारवाई थांबविण्याबाबत न्यायालयाकडून पालिकेला कोणत्याही सूचना आलेल्या नाही त्यामुळे प्रशासनाने 10 ऑक्टोबरपासून मुंबईतील 24 वॉर्डमध्ये कारवाईला सुरवात केली.
Tags:
Breaking
