भारत जोडो यात्रा समर्थनार्थ शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ

भारत जोडो यात्रा समर्थनार्थ शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ 

नगर शहर व तालुक्यातून खा.राहुल गांधींना १०,००० युवकांच्या 
सह्यांचे समर्थन पाठविणार : ॲड. अक्षय कुलट
 
 
। अहमदनगर । दि.01  ऑक्टोबर 2022 । महागाई, बेरोजगारी आणि जातीयवादाने विखुरलेला देश जोडणारी काँग्रेस नेते खा. राहूल गांधी गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू होऊन तब्बल चोवीस दिवस झाले आहेत. यात्रेला दाक्षिणात्य राज्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेस, नगर शहर ब्लॉक युवक काँग्रेस, भिंगार शहर ब्लॉक युवक काँग्रेस व नगर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. नगर शहर व तालुक्यातून खा.गांधींना माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली १०,००० युवकांच्या सहयांचे समर्थन पाठविणार असल्याचे नगर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट यांनी प्रतिपादन केले आहे. 

स्वाक्षरी मोहीम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलट यांच्यासह काँग्रेस शहर जिल्हा सरचिटणीस तथा सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, युवक काँग्रेस शहर जिल्हा सरचिटणीस वैष्णवी तरटे, शहर जिल्हा सरचिटणीस सुरज गुंजाळ, ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आकाश अल्हाट, कृष्णा साबळे, स्वराज शिंदे, रवी यादव, सुदर्शन पवार, प्रणव मकासरे, ऋतिक जाधव, गौरव भोसले, विशाल कुऱ्हाडे, स्तवन सोनवणे, महेश काळे, गौरव घोरपडे, आनंद जवंजाळ, विवेक तरटे, आकांक्षा गुंजाळ, सुयोग ठाणगे, नवीन पारधे, कल्पक मिसाळ, प्रणित अल्हाट आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वैष्णवी तरटे यावेळी म्हणाल्या की, राहुल गांधी यात्रेच्या माध्यमातून देशभरातील युवकांशी संवाद साधत आहेत. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आणि सत्तेत आल्यानंतर देखील सतत कोट्यावधी रोजगारांची घोषणा केली. मात्र आज बेरोजगारीचा उच्चांक देशाने गाठला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे युवा वर्गात नैराश्याची भावना निर्माण झाली असून यावर मात करण्यासाठी राहुल गांधींचा चेहरा त्यांना आश्वासक वाटत आहे. 

प्रवीण गीते म्हणाले की, नगर शहरातील युवकांच्या मनात देखील रोजगाराच्या प्रश्नावरून मोठी खदखद आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे नगर शहराचे पण नुकसान झाले आहे. युवकांना शिक्षण घेऊन जर रोजगार मिळणार नसेल, तर मुलांची लग्न कशी होतील ? त्यांची कुटुंब कशी चालतील ? त्यांच्या आई-वडिलांचा ते सांभाळ कसा करू शकतील ? असे रोजच्या दैनंदिन जीवनातले अनेक प्रश्न आ वासून तरुणाईपुढे उभे राहिले आहेत. 

सुरज गुंजाळ म्हणाले की, नगर शहर आणि तालुक्यातील युवकांशी संवाद साधत राहुल गांधींची बेरोजगारी विरोधात असणारी भूमिका पोहोचविण्याचे काम युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुरू केले आहे. त्यांच्या समर्थन आणि बेरोजगारीच्या विरोधात युवक स्वाक्षरी मोहिमेत स्वतःहून पुढे येत सहभागी होत आहेत. यातून स्पष्ट होते की देशांमध्ये बदल हवा आहे. हा या देशातील तरुणाईच्या आजचा आवाज आहे. युवक काँग्रेस राहुल गांधींचे हात यातून नक्की बळकट करेल. 
 
----------


 

Post a Comment

Previous Post Next Post