काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठी जिल्ह्यात 17 मतदार
। अहमदनगर । दि.13 ऑक्टोबर । तब्बल दोन दशकांनंतर होणार्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातून 17 मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. हे सर्व प्रदेश प्रतिनिधी असून, त्यांनाच मतदानाचा अधिकार असणार आहे. ही सर्व मंडळी 17 ऑक्टोबरला मुंबईत मतदान करणार आहेत.
दरम्यान, नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. पण नगर शहराच्या जिल्हाध्यक्षपदी असल्याने ते प्रदेश काँग्रेसवर शहर जिल्हाध्यक्ष प्रतिनिधी म्हणूनही असणे अपेक्षित होते. मात्र, ते मतदार नसल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
काँग्रेसच्या अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांना पक्षातून पक्षाध्यक्ष होण्याचा आग्रह होता. पण त्यांनी तो नाकारल्याने आता तब्बल 22-23 वर्षांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे व शशी थरूर असे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
खर्गे हे गांधी परिवाराचे निष्ठावंत मानले जातात. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता जास्त व्यक्त होत आहे. आता या निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, 17 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात म्हणजे टिळक भवनमध्ये मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात 565 प्रदेश प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार आहे. यात नगर जिल्ह्यातील 17जणांचा समावेश आहे. या प्रतिनिधींनी 17 रोजी मुंबईत वेळेत हजर राहावे व येताना पक्षाने दिलेले प्रदेश प्रतिनिधी कार्ड व आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड ओळखपत्र समवेत आणण्याचे सांगण्यात आले आहे.
शहरात एक व ग्रामीण सोळा महाराष्ट्राच्या मतदार यादीतील 565 मतदारांमध्ये नगर शहरातील एक व नगर जिल्हा ग्रामीण भागातून 16 मतदार आहेत. पक्षाचे विधीमंडळ गट नेते व संगमनेरचे आ. बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे(श्रीरामपूर), नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे (संगमनेर) यांच्यासह प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा नाईक (अकोले), प्रतिनिधी करण ससाणे (श्रीरामपूर), विनायक देशमुख (नगर-प्रदेश सरचिटणीस), जयश्री बाळासाहेब थोरात (संगमनेर),
हेमंत ओगले (श्रीगोंदे-प्रदेश सरचिटणीस), सचिन गुंजाळ (संगमनेर-प्रदेश सचिव), प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे (संगमनेर), कैलास शेवाळे (कर्जत- उपाध्यक्ष ग्रामीण), नगर ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके (कर्जत), राजेंद्र नागवडे (श्रीगोंदे), संपतराव म्हस्के (माजी अध्यक्ष, नगर तालुका), डॉ. एकनाथ गोंदकर (शिर्डी- उपाध्यक्ष ग्रामीण) व ज्ञानदेव वाफारे (पारनेर) असे 16 मतदार नगर ग्रामीणमधील असून,
नगर शहरातील एकमेव मतदार दीप चव्हाण आहेत. ते नगर शहराचे माजी शहर जिल्हाध्यक्ष आहेत. अशा जिल्ह्यातील 17 जणांना नवा काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी 17 रोजी मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. प्रदेश काँग्रेसद्वारे या मतदारांशी संपर्क साधण्यात आला असून, जिल्हा काँग्रेसद्वारेही या मतदारांना मतदान प्रक्रियेविषयी तसेच मतदानास जाताना समवेत आवश्यक असलेल्या पक्ष ओळखपत्र व आधारकार्ड वा इलेक्शन कार्ड ओळखपत्राबाबत जागृती केली जात आहे.
