। अहमदनगर । दि.11 ऑगस्ट । सुपा-पारनेर रोडवर अपघाताची मालिका चालूच असून, बुधवारी एका मालट्रकने वाळवणे येथील दोन शाळकरी मुलांना चिरडले. अपघाताची ही घटना समजताच सुपा पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले.
वाळवणे ता.पारनेर येथील थोरात व पठारे परिवारातील दोन मुले पारनेर येथे शाळेला जात असताना बुधवारी दुपारी 12 वाजण्यच्या दरम्यान माल ट्रक (क्र एमएच 18 इ - 0198) या ट्रकने धडक दिल्याने हे शाळकरी मुले गाडीच्या चाकाखाली आल्याने जागेवरच ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही विद्यार्थी पारनेर येथे परीक्षेसाठी जात असावेत असे बोलले जात आहे. या घटनेची माहिती कळताच सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीखाली गुंतलेले मृतदेह ट्रकच्या पुढील चाकाखाली गुंतलेली मोटारसायकल काढली.
घटनास्थळी जाऊन माहिती घेत दोन्ही मृतदेह पुढील सोपस्कारसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही मुले वाळवणे गावातील असून शाळेसाठी पारनेरला जात असतानाच अपघात झाला आहे. गावातील दोन तरुण मुले गेल्याने वाळवणे गावावर शोककळा पसरली आहे.
