। अहमदनगर । दि.08 ऑगस्ट । घरात पावसाचे पाणी शिरल्याने घर उघडे ठेवून शेजारी राहणाऱ्या भावाच्या घरात झोपण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. शुक्रवारी रात्री पावणे बारा ते शनिवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान शेंडी बायपास (ता. नगर) शिवारात ही घटना घडली.
याप्रकरणी सुरेश सुखदेव भगत (वय ४५) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री जोराचा पाऊस झाल्याने सुरेश भगत यांच्या घरात पाणी शिरले होते. घरात पाणी शिरल्याने त्यांना झोपण्यासाठी देखील जागा शिल्लक राहिली नव्हती. सुरेश हे कुटूंबासह त्यांच्या शेजारी राहणार्या भावाच्या घरी झोपण्यासाठी गेले.
सुरेश यांनी त्यांचे घर उघडे ठेवले होते. याचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी एक तोळ्याचा हार व एक तोळ्याचे गंठण असे दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सुरेश पहाटे घरात गेल्यानंतर त्यांचा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी शनिवारी दुपारी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक दीपक गांगर्डे करीत आहेत.
Tags:
Crime
