। अहमदनगर । दि.15 ऑगस्ट । आज आपण सर्व देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांनी बलिदान केले असे शूर जवान, थोर क्रांतिकारक यांना नमन केले पाहिजे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये संशोधनाबरोबरच शिक्षण व विस्तारामध्ये उल्लेखनीय असे काम केले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे , विद्यापीठ अभियंता श्री. मिलींद ढोके, विशेष कार्य अधिकारी डॉ. महानंद माने, मुख्य शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके, उपकुलसचिव श्री. विजय पाटील , सर्व विभाग प्रमुख, सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे उपस्थित होते.
यावेळी कुलगुरुंनी विद्यापीठाने इस्राइल तसेच ऑस्ट्रेलिया या विद्यापीठातील शिक्षण संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारांचा उल्लेख केला कृषी पारायण मॉडेल व्हिलेज तसेच शेतकरी आयडॉल या विस्तारात केलेल्या नाविन्यपूर्ण कार्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. यावेळी एनसीसी अधिकारी डॉ. सुनील फुलसावंगे यांनी परेडचे संचलन केले. सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे यांनी सुत्रसंचालन केले.
दरम्यान या वेळी पदयुत्तर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हाळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थी तसेच प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
