। अहमदनगर । दि.16 जुन । राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समिती, इसळक- निंबळक जिल्हा अहमदनगर आयोजित नगर तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाध्यक्षपदी मराठीतील समीक्षक, संशोधक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांची निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष रामदास कोतकर यांनी दिली.
संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी आ. सुधीर तांबे, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, मसापचे अध्यक्ष किशोर मरकड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कोतकर यांनी दिली आहे.
डॉ. शिरीष लांडगे हे श्रीरामपूर येथील असून सध्या ते भेंडे येथे जिजामाता शास्त्र आणि कला महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मराठीतील चरित्रात्मक कादंबरी या विषयावर संशोधन केले असून, त्यांच्या या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती लक्षवेधी ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
त्यांनी अक्षरांचा परिमळू, जीवन वेध, मराठी संशोधन व आंतरविद्याशाखीय संशोधन, समकालीन मराठी कथा, उत्कर्ष वाटा, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील कृत होळीची पोळी, मराठी कथा दर्शन, साहित्यरंग, रूप कवितेचे इत्यादी ग्रंथांची सहकार्याने संपादने केलेली आहेत. त्यांचे आजवर पंधरा ग्रंथ प्रकाशित झाले असून विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांतून ते सातत्याने लेखन करीत असतात.
सन २०२२ हे वर्ष लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीचे वर्ष आहे. त्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समिती, इसळक-निंबळक जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने ता. २६ जून २०२२ रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त नगर तालुका ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. हे संमेलन निंबळक येथील श्री क्षेत्र धरमपुरी येथे संपन्न होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अॅड. योगेश गेरंगे यांनी दिली.
या संमेलनात राजर्षी शाहू महाराज यांचे विचार यावर व्याख्यान, सध्याच्या काळातील साहित्यिकांची भूमिका हा परिसंवाद व निमंत्रितांचे कवी संमेलन आदी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक महादेव गवळी यांनी दिली आहे. या संमेलनाला रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीचे उपाध्यक्ष राहुल ठाणगे, सचिव संदीप गेरंगे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे. नुकतीच संमेलन आयोजनपूर्व बैठक झाली. या बैठकीस सुनील जाजगे, राजेंद्र खुंटाळे, प्रा. मच्छिंद्र म्हस्के आदींसह इतर समिती सदस्य उपस्थित होते.

.jpg)
