। अहमदनगर । राहुरी | दि.16 जुन । तालुक्यातील ब्राम्हणी येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत एका विवाहित तरूणीचा मृतदेह आढळला. ही घटना बुधवारी सकाळी समाेर आली. सारा उर्फ सोनी प्रसाद शिरसाठ वय २६, असे तिचे नाव आहे. तिला सासरच्या लोकांनी गळफास लावून मारले असुन खुनाचा गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा माहेरच्या लोकांनी घेतल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ब्राम्हणी येथे सारा ऊर्फ सोनी शिरसाठ ही विवाहिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मयत असल्याची माहिती दिली.
ही माहिती समजताच माहेरकडील नातेवाईकांनी शव विच्छेदन केंद्र व राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मुलीचा मृतदेह पाहुन आई वडिल तसेच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. राहुरीत शव विच्छेदनानंतर साराच्या माहेरकडील नातेवाईकांनी सासरच्या लोकांनी साडीच्या पदराने आमच्या मुलीच्या गळ्याला फास देऊन मारले, संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, हा पविञा घेतला.
साराचे माहेर राहुरी फॅक्टरी असून ७ वर्षांपूर्वी तिचा विवाह प्रसाद याच्याबरोबर झाला होता. लग्नानंतर काही महिन्यानंतर तिचा सासरकडील मंडळीकडून वेगवेगळ्या कारणावरून छळ सुरू असल्याचे माहेरच्या नातेवाईकांना म्हटले आहे. सासरच्या लोकांविरूद्ध विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम राहुरी पोलिस करत होते.