कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते फुले ऍग्रोमार्ट पोर्टलद्वारे कांदा बियाणे विक्री सुरु
कृषि विद्यापीठाच्या फुले ऍग्रोमार्ट ऑनलाईन पोर्टलला शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद
फुले ऍग्रोमार्ट ऑनलाईन पोर्टलद्वारे कांदा बियाणे विक्री सुरु
। अहमदनगर । दि.14 जुन । राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले कांद्याचे फुले समर्थ आणि बसवंत 780 या वाणांना शेतकर्यांची प्रथम पसंती असते. कृषि विद्यापीठाच्या बियाण्यांवर शेतकर्यांचा विश्वास आहे. शेतकर्यांना विनाकष्ट आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा जवळील जिल्ह्यामध्ये बियाणे उपलब्ध व्हावे म्हणुन विद्यापीठ कांदा बियाणे फुले ऍग्रोमार्ट पोर्टलद्वारे ऑनलाईन विक्री करत आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या खरीप कांद्याच्या बियाण्यांची विक्रीची नोंद आज ऑनलाईन पोर्टलद्वारे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते सुरु करण्यात आली. याप्रसंगी संशोधन आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, बियाणे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे उपस्थित होते.
यावेळी डॉ. शरद गडाख म्हणाले, या वर्षी कांदा पिकाचे फुले समर्थ या वाणाचे 10,533 किलो आणि बसवंत 780 या वाणाचे 226 किलो बियाणे ऑनलाईन पध्दतीने विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे बियाणे ज्या शेतकर्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करुन पैसे भरलेले असतील अशा शेतकर्यांना हे बियाणे त्यांनी दिलेल्या पर्यायानुसार कृषि विज्ञान केंद्र, धुळे, कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव, पिंपळगाव बसवंत संशोधन केंद्र आणि राहुरी कृषि विद्यापीठाच्या विक्री केंद्रावर उपलब्ध होईल.
पुढील वर्षी 50 टन कांदा बियाणे उत्पादनाचे नियोजन केलेले आहे. तसेच विविध फळपिकांचे 21 लाख रोपांचे पुढील वर्षासाठी नियोजन आहे. याप्रसंगी बियाणे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके म्हणाले ज्या शेतकर्यांनी कांदा बियाणेसाठी फुले ऍग्रोमार्ट पोर्टलवर नोंदणी केलेली आहे आणि नोंदणीवेळी जे कागदपत्रे पोर्टलवर जमा केले आहे त्या कागदपत्रांची झेरॉक्स आणि पैसे भरल्याची पावती बियाणे घेतांना विक्री केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बियाणे उत्पादन अधिकारी डॉ. सी.बी साळुंखे यांनी केले. आभार डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. मधुकर भालेकर, डॉ. विजय शेलार, डॉ. सुरेश झांजरे, डॉ. बी.डी. पाटील, डॉ. कैलास गागरे, प्रा. बी.टी. शेटे, डॉ. डी.एस. ठाकरे, डॉ. एस.आर. धोंडे, डॉ. ए.व्ही. सुर्यवंशी, डॉ. आर.बी. माने, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.