टी़ड़ीएस कपातीबाबत पोस्टाने खुलासा करावा
ग्राहक संघाचे बापट यांची मागणी
। अहमदनगर । दि.11 मे ।मुदत ठेवींवरील व्याजावर कापल्या जाणार्या टीडीएसबाबत पोस्ट ऑफिसने खुलासा करण्याची मागणी ग्राहक संघाचे माजी अध्यक्ष शिरीष बापट यांनी केली आहे.
याबाबत बापट यांचे म्हणणे आहे की, पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेवींवर एका वर्षात 40 हजार रुपयांपेक्षा जास्त आणि ज्येष्ठ नागरिकांना एका वर्षात 50 हजारांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर पोस्ट ऑफिसने 10 टक्के टीडीएस कापणे बंधनकारक आहे.
करदात्याने टीडीएस कापू नये यासाठी जे ज्येष्ठ नागरिक नाहीत त्यांनी ’15 जी फार्म’ व ज्येष्ठ नागरिकांनी ’15 एच फॉर्म’ भरुन दिल्यास टीडीएस कापला जात नाही. फक्त यासाठी त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर देयकर शून्य असणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट करून पुढे म्हटले आहे
की, या सर्व नियमात असूनही व ’15 जी’ व ’15 एच’ फार्म भरुन देऊनही पोस्ट ऑफिसमध्ये टीडीएस कापला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या वर्षापासून(2022-23) फार्म भरुनही सर्वांचाच टीडीएस कापला जाणार असल्याचे व केंद्र सरकारचा तसा आदेश असल्याचे पोस्टातील कर्मचारी सांगत आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे याबाबतचा सविस्तर खुलासा संबंधित जनरल पोस्ट ऑफिसच्या अधिकार्यांनी करावा, अशी मागणी बापट यांनी केली आहे.
Tags:
Ahmednagar