। अहमदनगर । दि.22 मे 2022। वाहन खरेदी-विक्री करणार्या एजंटमार्फत ट्रॅक्टरची विक्री करून ट्रॅक्टर घेऊन उरलेले चार लाख रुपये न देता फसवणूक करणार्या सोलापूर येथील आरोपीला कोतवाली पोलिसांनी शिताफीने अटक केली व त्याच्याकडील गुन्ह्यातील ट्रॅक्टर जप्त केला.
दि.4 एप्रिल 2022 रोजी प्रसाद चिंतामण हिंगे (रा. खोडद गडाचीवाडी, ता जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली की, शेती कामाकरीता सन 2021 मध्ये कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला होता व तो अहमदनगर येथील नाथ मोटर्स यांच्या मार्फत जुने वाहन खरेदी-विक्री करणार्या दुकानात विक्रीकरीता
लावलेला असताना त्याचा व्यवहार ठरल्याने दि. 13 जानेवारी 2022 रोजी मार्केट यार्ड भाजीपाला गेटसमोर रामचंद्र ज्ञानदेव भागीरे (राहणार सोलनकरवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) यांना 5 लाख 80 हजार रुपये किंमतीला विक्री सौदा करून इसार म्हणून 1 लाख 80 हजार रुपये घेवून ट्रॅक्टर
त्यांच्या ताब्यात देऊन उर्वरीत रक्कम 4 लाख रुपये दोन दिवसात आणून देतो असे ठरलेले असताना व्यवहाराचे उर्वरीत पैसे न देता ट्रॅक्टर घेऊन गेले व फसवणूक केल्याच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक विष्णु भागवत व पोलिस कॉन्स्टेबल सुमित गवळी यांना सोलनकरवाडी येथे पाठवण्यात आले होते. त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला असता ट्रॅक्टर आरोपीच्या घरासमोर मिळून
आल्याने तो गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे तसेच या ठिकाणी आरोपी रामचंद्र ज्ञानदेव भागीरे याला अटक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार देवराम ढगे करीत आहे.