। अहमदनगर । दि.21 मे 2022। पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेनऊ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पळणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय २७ रा. कानडे वॉशिंग सेंटरजवळ टिळक रोड, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
दि. २९ एप्रिल रोजी विना प्रकाश मुके (वय ६५ रा. ठाकूर गल्ली, तोफखाना) या परदेशी गल्ली येथून घरी जात असताना मोची गल्लीकडून आलेल्या अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून नेली होती.
या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलिस अंमलदार अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, सचिन बाचकर, अहमद इनामदार, धिरज खंडागळे यांचे पथक कल्याण रोड परिसरात गस्त घालत असताना
त्यांना सोन्या शिंदे संशयितरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका आठरे करत आहेत.
Tags:
Ahmednagar