। अहमदनगर । दि.27 मे । भोजनालय चालविण्यासाठी महिन्याला दोन हजार रुपये खंडणी देण्यास नकार देणार्या युवकाला पाच जणांनी मारहाण केल्याची घटना बालिकाश्रम रोडवर घडली. ओंकार महेश टाक (वय 21, रा. समता कॉलनी, विनायकनगर) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.
त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भावड्या ऊर्फ ऋषिकेश दरंदले, रजनीश वाघ, टिंग्या साळवे व दोन अनोळखींविरुध्द दरोडा, खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार टाक हे बालिकाश्रम रोडवर सर्वस्व नावाचे भोजनालय चालवितात.
ओंकार बालिकाश्रम रोडवर असताना दोन दुचाकींवरून पाचजण त्यांच्याकडे आले व म्हणाले,‘तुला तुझे भोजनालय चालवायचे असेल तर तुला आम्हाला दर महिन्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील’, यावर, ओंकारने पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने पाचजणांनी
त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ओंकार यांच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीची दोन तोळ्याची चेन लंपास केली असून मोबाईल फोडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.
