महात्मा फुले कृषि विद्यापीठात 62 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले काम करुन विद्यापीठाचे नांव जगभर करु या : कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
। अहमदनगर । दि.01 मे । संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून 107 हुताम्यांच्या बलिदानामुळे 1 मे, 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. क्रांतीसिंह नाना पाटील, श्री. डांगे, शाहिर अण्णाभाऊ साठे, शाहिर अमर शेख यांनी आपल्या शाहिरीने त्या काळी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या मनात स्वाभीमानाचे स्फुलींग पेटविले त्या सर्वांची आठवण आपण सर्वांनी जागविली पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या जडणघडणीत खर्या अर्थाने आपले बहुमुल्य असे योगदान दिले.
महाराष्ट्राने आतापर्यंत औद्योगीक, शैक्षणिक आणि कृषि क्षेत्रात केलेल्या सर्वांगीन विकासामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्वाची भुमीका बजावली आहे. देशाच्या विकासात कामगारांचाही सहभाग फार मोठा आहे म्हणुन आजचा दिवस कामगार दिवस म्हणुनही साजरा केला जातो. महात्मा फुले कृषि विद्यापीठ शेतकर्यांसाठी सदैव कार्यरत आहे. विद्यापीठाने आत्तापर्यंत विविध पिकांमध्ये केलेल्या वाणांच्या निर्मितीमुळे 2 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचा परतावा शेतकरी बांधवांना मिळालेला आहे. शेतीसमोर असंख्य समस्या आहेत.
तरीही या महाराष्ट्र दिनाच्या प्रसंगी आपण जबाबदारीने तसेच चांगले काम करुन विद्यापीठाचे तसेच महाराष्ट्राचे नांव जगभर करु या असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात 62 वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलींद ढोके, हाळगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, उपस्थित होते. या प्रसंगी विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar