केंद्राचा मोठा निर्णय; अमरनाथ यात्रेकरूंना ५ लाखांचं विमा कवच
। नवी दिल्ली । दि.18 मे 2022 । यंदा अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना प्रत्येकी ५ लाखांचं विमा कवच देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षांनंतर अमरनाथ यात्रेला परवानगी मिळाल्यामुळे यंदा सुरक्षेसह इतर सर्व व्यवस्था चोख ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदा प्रत्येक यात्रेकरूला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन अर्थात आरएफआयडी टॅग दिले जाणार असल्याचेदेखील केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. यात्रेदरम्यान आवश्यक असलेले सर्व केंद्रीय निमलष्करी दल तैनात करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना यावेळी त्यांनी गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा प्रमुखांना दिल्या.
तसेच यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, अशा सुविधा द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. ही बैठक दोन टप्प्यात पार पडली. दरम्यान, यंदाची अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरू होणार असून परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल कार्यालयातून देण्यात आली.
जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आरएफआयडी टॅग केवळ वाहनांनाच दिले जात होते. मात्र यंदा पहिल्यांदाच यात्रेकरूंना दिले जाणार आहेत. यासोबतच टेंट, वायफाय, हॉटस्पॉट, पुरेशी प्रकाश व्यवस्था यासारख्या आवश्यक सोयी यात्रेकरूंच्या पूर्ण मार्गात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच बाबा बर्फानींचे ऑनलाईन लाईव्ह दर्शन, अमरनाथ गुहेतील सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीचे लाईव्ह दर्शन, यात्रेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले जाणार आहे.
-----------------
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर हल्लाबोल