भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
खासदार सुप्रिया सुळे, आ. जगताप यांनी मांडले किल्ल्याचे प्रश्न
। अहमदनगर । दि.08 मार्च । ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची पाहणी करून मनाला खूप आनंद झाला. आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेले प्रश्न केंद्र सरकारकडून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या जागेला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह विविध महापुरुषांचा इतिहास लाभला आहे.
किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू व संरक्षण खात्याच्या अटी-शर्ती शिथीलतेसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज अहमदनगर दौर्या आल्या असता त्यांनी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कार्यध्यक्ष अभिजित खोसे, स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, अमित खामकर, संजीव भोर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी भुईकोट किल्ल्याचा इतिहास खासदार सुप्रिया सुळे यांना सांगून काही प्रश्न मांडले. आमदार संग्राम जगताप म्हणाले, की भुईकोट किल्ला हा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे.या ठिकाणी पर्यटकांना भुईकोट किल्ला पाहण्यासाठी परवानगी मिळत नाही तरी
संरक्षण खात्याच्या अटी-शर्ती व नियम शिथील करून पर्यटकांना कायमस्वरूपी भुईकोट किल्ला पाहण्यासाठी खुला करावा जेणेकरून नगर शहराच्या पर्यटन चळवळीला व व्यवसायी करण्याला चालना मिळेल. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.
भिंगार शहर छावणी परिषदेच्या हद्दीत येत असलेले विविध प्रश्न प्रलंबित आहे तरी हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी सुळे यांच्याकडे केली.