। अहमदनगर । दि.03 मार्च । पाथर्डी तालुक्यातील मोहाटा गावाकडून पाथर्डीकडे जाणार्या मार्गावरील कारेगाव या ठिकाणी वळण रस्त्यावर मारुती अल्टो कार व दुचाकी यांच्यात जोराची धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये उत्तम आनंदा खेडकर (वय 67 रा.चिंचपूर इजदे, ता, पाथर्डी, जि, अहमदनगर) हे सेवानिवृत्त शिक्षक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.1) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, खेडकर हे त्यांची दुचाकीवरून (क्रमांक एम.एच.16 ए. ए.5926) पाथर्डी शहराकडे त्यांच्या पत्नी प्रभावती उत्तम खेडकर यांच्यासह मंगळवार (दि. 1) रोजी दुपारी साडेबारा वाजता निघाले होते. यावेळी पाथर्डी शहराकडून भरधाव वेगाने निघालेल्या मारुती अल्टो कारने (क्रमांक एमएच 01 व्हीए 5785) समोरून त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या जोराच्या धडकेमुळे खेडकर दाम्पत्य जोरात बाजूला फेकले गेले.
यामध्ये खेडकर यांच्या डोक्याला व हाता-पायाला जबर मार लागला. जवळ असणार्या नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी प्रभावती यांनाही जबर मार लागला असून त्यांच्यावर नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर पाथर्डी पोलिस ठाण्यात नितीन महादेव खेडकर यांच्या फिर्यादीवरून मारुती अल्टो कार चालक महादेव दशरथ खोपडे (रा. गांधनवाडी, ता.आष्टी जि.बीड) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिस करीत आहेत.