आयोध्यानगरला जिल्हा कबड्डी संघटनेचा सत्कार
नगरचे नाव देशपातळीवर झळकविण्याचे कबड्डी खेळाडूंचे स्वप्न : शंतनु पांडव
। अहमदनगर । दि.19 मार्च । ठाणे येथे नुकत्याच पार पाडलेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी जिद्द, मेहनतीच्या बळावर चांगली कामगिरी करुन मुंबई संघावर विजय मिळविला आणि 69 वर्षांनंतर नगर जिल्ह्याला सुवर्णपदक मिळाले. हा आपल्या जिल्ह्याचा बहुमान आहे. नगरचे नाव आता देशपातळीवर झळकविण्याचे कबड्डी खेळाडूंचे स्वप्न आहे व ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी दिलेली शाबासकीची थापच प्रोत्साहन, प्रेरणा देणारी ठरणार आहे, असे प्रतिपादन संघ प्रशिक्षक शंतनू पांडव यांनी केले.
पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकातील आयोध्यानगरला विजयी संघाचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार, संघ व्यवस्थापक सतीश मोरकर, जिल्हा कबड्डी असो.चे विनायक भुतकर, कर्णधार शंकर गदाई, राहुल खाटीक, राम अडागळे, आदित्य शिंदे, राहुल धनवटे, राहुल आगळे, संभाजी वाबळे, देवीदास जगताप, प्रफुल्ल झावरे, अजिंक्य जिवरक, अजित पवार, प्रेम खुरांगे आदिंसह महादेव प्रतिष्ठानचे शिवाजी लगड, दिनेश कुलकर्णी उपस्थित होते.
पांडव पुढे म्हणले, सर्वसामान्य कुटूंबातील हे सर्व खेळाडू आहेत. सांघिक खेळाचे प्रदर्शन करुन अंतिम सामन्यात राज्यस्तरीय विजेपदाचा किताब मिळाल्याने जिल्ह्याचा राज्यात नावलौकिक निर्माण झाला आहे. अशीच कामगिरी भविष्यात करुन नगरचे नाव देशपातळीवर उंचावण्यासाठी प्रयत्न करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासर्व खेळाडूंचा सत्कार नगरसेवक सुनिल त्र्यंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री.वारे म्हणाले, प्रत्येक माणसात काही तरी गुण असतात, त्याला वाव मिळण्यासाठी चांगले प्रशिक्षक लागतात ते आज शंतनू पांडव यांच्या रुपाने या संघातील खेळाडूंना लाभले. श्री.त्र्यंबके यांनी खेळाडूंना मानधन म्हणून संघाला काही रक्कम बंद पाकिटातून भेट दिली. बाळासाहेब पवार म्हणाले, शासकीय स्तरावर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करु.
प्रास्तविकात दिनकर थोरात यांनी शंतनु पांडव यांचे क्रीडा क्षेत्रात प्रत्येक खेळाला प्रोत्साहन देण्याचा सतत प्रयत्न असतो. कबड्डी खेळाला त्यांनी एक यशस्वी प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली, त्याला संघाच्या खेळाडूंनी चिकाटीने साथ दिली व नगरचे नाव राज्यात झळकले. याबद्दल घरातील, कॉलनीतील प्रत्येकाला ही अभिमानाची बाब आहे, त्यामुळेच हा नागरी सत्कार आयोजित केला. संघालाही एक प्रेरणा देण्याचा महादेव प्रतिष्ठान व आयोध्या नागरिकांचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे सांगून सर्वांचे आभार मानले.
यावेळी तुकाराम पांडव, रंजना पांडव, कैलास शेळके, रघुनाथ औटी, तुकाराम महामुनी, रामप्रसाद खंडेलवाल, श्री.बुरगुल, रमेश संत, राजाराम लंके, कैलास फुंदे, कमल शेळके, मीना थोरात, स्वाती कुलकर्णी, वैशाली पांडव, सुभद्रा लगड आदि उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar