वारकऱ्यांच्या सुरक्षितता, सुविधांना प्राधान्य देऊन समन्वयाने नियोजन करा : पालकमंत्री

वारकऱ्यांच्या सुरक्षितता, सुविधांना प्राधान्य देऊन समन्वयाने नियोजन करा : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

। अहिल्यानगर । दि.19 जुन 2026 ।  आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होत असतात. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला व सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे. वारी मार्गावरील सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून सुरक्षित, स्वच्छ व सुरळीत वारीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, मानाच्या पालख्यांचे प्रमुख, विविध दिंडी प्रमुख तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणांहून अनेक दिंड्या आपल्या जिल्ह्यामार्गे पंढरपूरकडे जातात. श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. वारी मार्गावरील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून ते खड्डेमुक्त करावेत. दिंडी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्थापन चोखपणे करण्यात यावे. मुक्कामस्थळी चोरी, गैरप्रकार अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी विशेष दक्षता घ्यावी. पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दिंडी मार्गावरील सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता यावर विशेष भर द्यावा. मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण तसेच अखंडित वीजपुरवठा उपलब्ध राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. सोलापूर  जिल्ह्यांतही वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी व प्रशासनाशी समन्वय साधण्यात येईल, असेही ते म्हणाले.

दिंडी मार्गावर आवश्यक वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, औषधसाठा आणि आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालयांमध्ये वारकऱ्यांच्या मोफत उपचाराची सोय करावी. वारकऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक उपचार तत्काळ उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक दिंडीसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबरोबरच दिंड्यांच्या मुक्कामाचे नियोजन व संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेली संपर्कसूची तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देतानाच एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहनही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी केले.बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तयारीचा सविस्तर आढावा सादर केला.बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, पालखी प्रमुख आणि दिंडी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post