। अहमदनगर । दि.09 मार्च । नगर तालुक्यात कामरगाव घाटमाथा येथे रस्त्याने गाडीत चाललेले कापड व्यावसायिक हरिभाऊ गणपत अकोलकर (वय 37, रा. भायगाव, भातकुडगाव, ता. शेवगाव) हे पत्नीसह जात असताना त्यांच्या गाडीसमोर (एमएच 12 टीएच 8820) हिच्यावरील चालकाने गाडी उभी करून त्यातून दोघेजण बाहेर आले व हरिभाऊ अकोलकर यांना म्हणाले की,
तू आमच्या गाडीला कट का मारला, असे म्हणत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. अकोलकर यांच्या पत्नीसही बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघे पती-पत्नी जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता पुणे हलवण्यात आले व त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले.
या प्रकरणी हरिभाऊ गणपत अकोलकर याच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसात गाडी चालक व दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जंबे करीत आहेत.