पत्रकार कल्‍याण निधीमध्ये १५ कोटींची वाढ

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीमध्ये १५ कोटींची वाढ

। मुंबई । दि.11 मार्च । अर्थसंकल्‍पात शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीमध्ये 15कोटींची वाढ करण्यात आली आहे.यामुळे ज्‍येष्‍ठ पत्रकारांना निवृत्‍तीवेतन मिळणे अधिक सुकर होणार आहे.गेल्‍या वर्षीही अर्थसंकल्‍पात 10 कोटींची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेमुळे हा निधी 50 कोटींपर्यंत पोहोचला आहे.

पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीद्वारे आर्थिक मदत दिली जाते.शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी कल्याण निधीच्या व्याजातून आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ज्‍येष्‍ठ पत्रकारांसाठी राबविण्यात येते.

पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातील मागणी विविध पत्रकार संघटना, लोकप्रतिनिधी विधानमंडळ सदस्यांकडून शासनाकडे वारंवार करण्यात येत होती. राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी पत्रकार सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे.या निधीमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी विविध पत्रकार संघानी यावर्षी केली होती.

कोरोनाच्या कठीण काळात राज्‍याच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान असतानाही ज्‍येष्‍ठ पत्रकारांना निधी उपलब्‍ध करून दिल्‍याबददल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विविध पत्रकार संघटनांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post