। मुंबई । दि.24 फेब्रुवारी । अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून शांततापूर्वक आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ते तसेच नेत्यांकडून करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि नवाब मलिक यांच्या कुटुंबातून त्यांची मुलगी नीलोफर मलिक आणि भाऊ कप्तान मलिक उपस्थित होते. तसेच यावेळी मंत्री मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच केंद्र सरकारकडून राज्य सरकारला टार्गेट केले जात आहे. ईडीकडून नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. चुकीच्या प्रकरणात नवाब मलिक यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मलिकांना बदनाम करून अतिरेकी संघटनांशी त्यांचा संबंध गोवण्याचा प्रयत्न केला जातो. लोकांच्याही आता हे लक्षात आले आहे. अशी अन्यायपूर्वक कारवाई महाराष्ट्रात सहन केली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी दिला.