। मुंबई । दि.08 फेब्रुवारी । गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दु:खातून देश अजून बाहेरही पडलेला नाही तोपर्यंत आता मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. बीआर चोप्रा यांच्या महाभारतात भीमची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचं निधन झालं आहे.
वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. प्रवीण कुमार सोबती हे अनेक दिवसांपासून आजार आणि आर्थिक संकटाशी झुंज देत होते. त्यांनी आपल्या मजबूत शरीरयष्टीच्या जोरावर एक खेळाडू म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
'महाभारत' या टीव्ही मालिकेने अनेक पिढ्यांना आकर्षित केलं आहे. दूरदर्शनवरील ही एक प्रचंड लोकप्रिय मालिका होती. आजही लोक या मालिकेविषयी तितक्याच उत्सुकतेने बोलतात. नुकताच लॉकडाऊनमध्ये या मालिकेचं पुनःप्रसारान झालं आणि या मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा प्रकाशात आले.
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला एक खास ओळख मिळाली होती. ही ओळख आजही कायम आहे. परंतु मालिकेतील भीम म्हणजेच अभिनेता प्रवीण कुमार सोबती हे फारच हलाखीचं आयुष्य जगत होते.