स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी शिक्षा झाल्यानंतर फरार झालेला जेरबंद


। अहमदनगर । दि.21 फेब्रुवारी ।  पतसंस्थेची फसवणूक करणारा व न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडले. दीपक भारत सावेकर (रा.आनंदी बाजार, गांधी मैदान, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील लक्ष्मीनारायण सहकारी नागरी पतसंस्था विरुध्द दीपक भारत सावेकर एन.आय. अ‍ॅक्ट कलम 138 या खटल्यामधील आरोपी दीपक भारत सावेकर यास दोषी ठरवून एक वर्ष कारावास व आठ लाख रुपये नुकसान भरपाई व नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ज्ञा. र. दंडे सुनावली होती. पण, शिक्षा सुनावल्यापासून आरोपी फरार झाला होता.

या प्रकरणी न्यायालयाने आरोपी समक्ष हजर ठेवण्याबाबत क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 75 प्रमाणे नॉन बेलेबल वॉरंट काढून दोषसिध्द आरोपीस कारागृहात पाठविण्यासाठी तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेश पोलिसांना दिले होते.

पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार यांचे स्वतंत्र पथक या आरोपीच्या शोधासाठी नेमले होते. आरोपी दीपक सावेकर हा त्याच्या राहत्या घरी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने त्या ठिकाणी जाऊन सावेकर यास ताब्यात घेऊन अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले.

 ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस हवालदार संदीप घोडके, संदीप पवार, फकिर शेख, पोलिस नाईक शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, देवेंद्र शेलार, पोलिस कॉन्स्टेबल योगेश सातपुते व कमलेश पाथरुट आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post